
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च (हिं.स.)। हुतात्मा दिनाचे औचित्य साधून ‘माय भारत’ संस्थेतर्फे देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘हुतात्मा दिवस पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव या स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.
'माझा भारत, माझी जबाबदारी' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत करणे, तसेच नागरी जबाबदारी आणि सामुदायिक विकासासाठी त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे.
या पदयात्रेत प्रत्येक जिल्ह्यात किमान 500 युवा स्वयंसेवकांचा सहभाग अपेक्षित असून, युवक एकता, शिस्त आणि देशभक्तीचा संदेश देतील. पदयात्रेपूर्वी 19 मार्चपासून ‘माय भारत’ पोर्टलवर ‘अनसंग हिरोज’ या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि “एक युवा ऐसा भी” या विषयावर रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आगामी 22 मार्च रोजी स्वच्छता मोहीम व रस्ते सुरक्षा जनजागृती यांसारख्या उपक्रमांद्वारे ‘सिव्हीक सेन्स चँलेंज’ राबविण्यात येत आहे. पदयात्रेची सुरुवात हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अभिवादन सभेने होणार आहे.ही पदयात्रा अंदाजे 2 ते 4 किलोमीटर अंतराची असून शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येईल. सहभागी युवक हातात तिरंगा, डोक्यावर टोपी आणि “राष्ट्रनिर्मितीसाठी युवक” तसेच “स्वातंत्र्याचा आदर करा, जबाबदारीने वागा” अशा संदेशांचे फलक घेऊन सहभागी होतील.या उपक्रमाच्या माध्यमातून युवाशक्तीला विधायक कार्यासाठी संघटित करणे, तसेच समाजात शिस्त व नागरी जाणीव निर्माण करणे हा उद्देश आहे. नागरिक, शैक्षणिक संस्था व विविध युवा संघटनांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis