
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यातील कवठे येमाई, वडनेर आणि बावडा परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या वेळी झालेल्या गारपिटीमुळे ऊस, कांदा, कोथिंबीर आणि मेथी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली. सध्या घसरलेल्या शेतीमालाच्या बाजारभावामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणीत पावसामुळे वाढ झाली आहे. कवठे येमाई : कवठे येमाई, मलठण, सविंदणे, रावडेवाडी परिसरातील गावांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.तासभर कोसळलेल्या गारपिटीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही कोसळली. गहू, कांदा, चारापिके यांसह कोथिंबीर, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळाला. त्यामुळे आंबा व डाळिंब फळबागांनाही पावसाचा फटका बसला आहे. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी कांदा काढणीची लगबग सुरू असताना आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु