
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
घरगुती खानावळी बंद झाल्याने रुपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, तळवडे या भागांत ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहून शिकणाऱ्या विद्यार्थी आणि कंपन्यांमधील कामगारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या हॉटेल्सही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना अर्धपोटी राहून दिवस काढावे लागत असून त्यांच्या शिक्षण आणि नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असंख्य महिला वैयक्तिक पातळीवर आणि बचत गटांच्या माध्यमातून घरगुती डबे अथवा खानावळी चालवितात. मात्र, आखाती युद्धामुळे सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद आहे. त्यामुळे महिला आणि त्यांचे बचत गट सध्या अडचणीत आले आहेत.रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर भागांत विविध कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आणि आयटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात राहतात. अनेक महिलांकडे घरगुती डबे घेऊन जाणारे किंवा खानावळीत जेवणारे अनेक विद्यार्थी, कर्मचारी आहेत. मात्र, अचानक या खानावळी बंद झाल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय अनेक चौकातील नाष्टा सेंटर, स्नॅक्स सेंटर व चहाचे स्टॉल तेही गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु