कोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा २३ ते २६ मार्च दरम्यान भव्य सोहळा
कोल्हापूर, 20 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेतील अजरामर ठेवा असलेल्या ‘संपूर्ण गीतरामायण’चे भव्य आयोजन कोल्हापूरात येत्या २३ ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात दररोज सायंकाळी साडेपाच वाजत
ब्राह्मण समाज तर्फे संपूर्ण गीत रामायण


कोल्हापूर, 20 मार्च (हिं.स.)।

महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेतील अजरामर ठेवा असलेल्या ‘संपूर्ण गीतरामायण’चे भव्य आयोजन कोल्हापूरात येत्या २३ ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, संपूर्ण ५६ गीते सर्व कडव्यांसह सादर केली जाणार आहेत.

अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, स्वरब्रह्म संस्था आणि प्रसारमाध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कै. ग.दि. माडगूळकर यांनी रचलेले आणि भावतीर्थ कै. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या संगीताने सजलेले ‘गीतरामायण’ सलग पाचव्या वर्षी कोल्हापूरात सादर होत आहे. यापूर्वीच्या चार वर्षांत या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

पश्चिम महाराष्ट्रात सर्व गीते व सर्व कडव्यांसह ‘संपूर्ण गीतरामायण’ सादर करणारा स्वरब्रह्म हा एकमेव समूह ठरला आहे. स्वरब्रह्मचे संस्थापक स्व. सुधीर दाजी जोशी यांचे सुपुत्र रोहित जोशी यांनी सलग साडेआठ तास गीतरामायण गायन करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे, हा कोल्हापूरच्या सांगीतिक परंपरेसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे

२३ मार्च (उद्घाटन) : महापौर रुपाराणी निकम, अजित ठाणेकर, दीपा ठाणेकर व दिलीप गुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होणार असून, ज्येष्ठ गायक शिवराज पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे.

२४ मार्च : डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. शर्वरी मिरगुंडे तसेच सुबोध गद्रे यांचा सत्कार.

२५ मार्च : प्रसिद्ध तबलावादक अतुल ताडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कारकिर्दीचा गौरव.

२६ मार्च (रामनवमी – समारोप) : तबलावादक प्रशांत देसाई व गायिका डॉ. भाग्यश्री मुळे यांच्या कार्याचा सन्मान.

या सोहळ्यात स्वरब्रह्म समूहातील १० गायक व १२ गायिका सहभागी होणार असून संवादिनी, व्हायोलिन, तबला, बासरी आदी वाद्यांच्या साथसंगतीत गीतरामायण सादर केले जाणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मयूर कुलकर्णी करणार आहेत. तसेच ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर व कार्यवाहक श्रीकांत लिमये यांचे सहकार्य करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande