
अमरावती, 20 मार्च (हिं.स.) : चिखलदरा, अंजनगाव सुर्जी आणि भातकुली तालुक्यातील बहुतांश परिसरात गुरुवारला दुपारी अचानक हवामान बदलले आणि धुव्वाधार-मुसळधार पाऊस आणि गारपीटचा तडाखा बसला. जोरदार वाऱ्यावर विजांच्या कडकडाटात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह व परीसरातील गावात शेतकऱ्यांच्या गहू आणि हरभरा पिकाचे तर अंजनगाव सुर्जी तालुक्यात गहू, चना, कांदा, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावती शहरासह नांदगाव, अचलपूर आणि दर्यापूर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा बाग, चिंचोली बु. येथे मुसळधार पाऊस बरसला. व भातकुली तालुक्यातील काही गावांमध्ये देखील गारपीटीसह पाऊस कोसळला आहे. या अवकाळी पावसामुळे चना, गहु या पींकाना सर्वाधिक फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.चिखलदरा तालुक्यातही दुपारी हवामान अचानक बिघडले आणि विजांच्या कडकडाटात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्या वेळात गारपिट सुरु झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतातील सोंगणीवर आलेली उभी पिके पूर्णपणे जमीनदोस्तझाली. अनेकपिके काढणीसाठी जवळजवळ तयार होती, परंतु अचानक आलेल्याया नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी