
अमरावती, 20 मार्च (हिं.स.) | ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाला सुरुवात होते तेव्हापासून शेतकऱ्यांची शेतात पेरणीसाठी लगबग सुरू होते. युरीया सारख्या रासायनिक खताची मात्रा पिकांच्या वाढीसाठी जमीनीत अत्यावश्यक असल्याने यावेळी युरीयाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु, रब्बी हंगामातील पिकांनासुद्धा मागणीनुसार युरीया उपलब्ध झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके युरीयाविणा मोठी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना या हंगामात पाहिजे त्या प्रमाणात गहु, हरभऱ्याचे उत्पादन घेता आले नाही.
मार्च महिन्यापासुन संत्रा झाडाकरिता युरीया खत अतिशय महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून युरीयाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र असे असताना जानेवारी पासूनच तालुक्यासह सर्वत्र युरीयाचा तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे युरीया खताच्या कमतरतेमुळे जमीनीतील नायट्रोजनचे प्रमाण कमी झाल्याने संत्रा फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध न झाल्यास संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च जास्त व उत्पादन कमी होणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून युरीया उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी