
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
आखाती देशातील संघर्षाचे पडसाद आता शेती क्षेत्रावरही उमटत आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे प्लास्टिक उद्योगावर परिणाम झाला असून, त्याचा थेट परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीवर होत आहे. परिणामी ठिबक सिंचन साहित्य, पीव्हीसी पाइप, फिटिंग्ज तसेच अन्य प्लास्टिक अवजारांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ठिबक सिंचनासाठी लागणारे बंडल, जोडणीसाठीचे फिटिंग साहित्य तसेच इतर प्लास्टिक वस्तूंच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
उन्हाळा सुरू होताच पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार सिंचनासह अन्य प्लास्टिकच्या साहित्याची मोठी मागणी वाढते. मात्र सध्या या साहित्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेती उत्पादनाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसतानाच शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः उन्हाळी भाजीपाला, ऊस तसेच फळबागांसाठी ठिबक सिंचन अत्यावश्यक असल्याने अनेक शेतकऱ्यांना वाढीव दरात साहित्य खरेदी करावे लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु