रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासनात विषय समित्यांचे सभापतिपद अत्यंत महत्त्वाचे मानले जा
रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड २५ मार्चला


रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २५ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनात विषय समित्यांचे सभापतिपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धोरणात्मक निर्णय, योजना अंमलबजावणी आणि विभागनिहाय कामकाज यामध्ये या पदांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे या पदांवर कोणाची निवड होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सत्ताधारी पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी काही अनुभवी आणि निष्ठावान नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. चिपळूणच्या मयूरी शिर्के यांना महिला व बालकल्याण समिती सभापतीपद मिळण्याचे संकेत असून महिलांच्या प्रश्नांवरील त्यांची जाण आणि प्रशासकीय अनुभव यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे.

रत्नागिरीचे प्रकाश रसाळ यांच्याकडे समाजकल्याण समितीची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. वंचित घटकांसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल.

राजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रकाश कुवळेकर यांच्या नावाचा विचार शिक्षण व अर्थ समितीसाठी केला जात आहे. शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि अर्थसंकल्पीय नियोजनात त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, असा पक्षाचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

गुहागर तालुक्यातील महेश नाटेकर यांना कृषी समिती सभापतिपद दिले जाण्याची शक्यता आहे. कोकणातील शेती व बागायतदारांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चळके यांच्याकडे बांधकाम व आरोग्य या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ग्रामीण भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीसाठी त्यांच्या नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande