
सोलापूर, 20 मार्च (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाचा गोडवा कागदावरच उरला असून, प्रत्यक्षात मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांपैकी तब्बल ३१ कारखान्यांकडे १५ मार्चअखेर सुमारे ९५० कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनानंतर कारखान्यांनी पहिला हप्ता २५०० ते ३०२५ रुपये जाहीर केला होता. मात्र, आता तेच कारखाने एफआरपीच्या आड दडून शेतकऱ्यांना कमी रक्कम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, एफआरपी ही साखर उताऱ्यावर ठरते आणि अनेक कारखान्यांमध्ये ती जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या दराचा विसर कारखानदारांना पडल्याचे चित्र दिसत आहे.
कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण ऊसबिले अदा करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात १ कोटी ५७ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ हजार ६४३ कोटी रुपये मिळाले आहेत. एफआरपीनुसार २६ कारखान्यांकडे ४३२ कोटी रुपये थकीत आहेत. असे असले तरी, कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची सुमारे ९५० कोटी रुपयांची ऊसबिले अडकली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड