
रत्नागिरी, 20 मार्च, (हिं. स.) : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल बंद करण्याची मागणी परिसरातील ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केली. संबंधित ठरावांसह निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील प्रमुख आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली. कंपनी बंद होईपर्यंत सांविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.
बैठकीस लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्य उपस्थित होते. रवींद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या ११ ग्रामपंचायतींनी मिळून ४५ सदस्यांची लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती स्थापन केली असून स्थानिक नागरिकांच्या भावना प्रशासनापुढे मांडण्यात आल्या. कंपनीमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतींनी कंपनीविरोधात मंजूर केलेले ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी कंपनी बंद होईपर्यंत लढा सुरूच राहील, अशी ठाम भूमिका ग्रामपंचायतींनी घेतली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील या कंपनीकडून घातक ‘पिफास’ (PFAS) रसायनाचे उत्पादन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू असून, आता ग्रामपंचायतींच्या ठरावांमुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. प्रशासनासमोर या वाढत्या विरोधामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी