
बीड, 21 मार्च (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे १९ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन (नर्मदा परिक्रमा पूर्ण भगवानबाबा महाराज पात्रुडकर) यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे. या भक्ती सोहळ्याला प्रारंभ झाला असून, पात्रुड नगरीत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या १९ वर्षांपासून पात्रुड ग्रामस्थांनी ही आध्यात्मिक परंपरा अत्यंत निष्ठेने आणि एकजुटीने जपली आहे. १९ व्या वर्षात
पदार्पण करणारा हा सोहळा यावर्षी अधिक भव्य स्वरूपात साजरा होत असून, यानिमित्ताने संपूर्ण गावात स्वच्छतेची मोहीम आणि मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ३ ते ५ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १२ ते १ गाथा भजन, २ ते ५ श्री भागवत कथा, कथा प्रवक्त्या (श्री ह भप ज्ञानेश्वरीताई बागुल नाशिक) यांच्या अमृतमय वाणीतून पार पडणार आहे. ५:३० ते ६:३०
हरिपाठ, रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. या प्रदीर्घ परंपरेमुळे पात्रुडसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये या सप्ताहाबद्दल मोठी श्रद्धा आहे. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होऊन त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis