
अमरावती, 21 मार्च (हिं.स.)
सगळ्या देशात आणि महाराष्ट्रात वर्षप्रतिपदा उत्साहात साजरी होत असताना राहुल गांधींसह सर्व काँग्रेसजनांना हिंदू परंपरांचा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान करण्याची सवय जडली आहे. काल गुढीपाडवा या हिंदूंच्या सगळ्यात महत्वपूर्ण सणाच्या दिवशी देखील अफवांनी परिपूर्ण राजकीय घोषणाबाजी करत यशोमती ठाकूर आणि काँग्रेसवाल्यांनी हिंदू परंपरेचा अपमान केल्याचा निषेध भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.
सिलेंडर झाला आडवा - कसा करू पाडवा, असा सवाल काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गुढी उभारताना विचारला. बिचार्या यशोमतीताई, महिनाभरात त्यांच्या घरी सिलेंडर नाही. बंगल्याच्या समोर फुंकणी घेऊन रोज चूल फुंकत आहेत. उज्वला गॅस योजनेचे सिलेंडर ताईंच्याच घरी पाठवायची आवश्यकता आहे. देशभर आणि महाराष्ट्रात सर्वत्र गुढी पाडवा उत्साहात, धुमधडाक्यात साजरा झाला. प्रचंड उत्साहात भारतीय नववर्षाचे स्वागत झाले. देशाची अडचण ती स्वतःची अडचण मानून कुठे अडचण असेलही तर कोणीच अडचणींचा पाढा वाचला नाही. पण यशोमतीताईंचे काहीच चुकले नाही. डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असलेल्या काँग्रेस सरकारच्या काळात १२४१ रुपयांचे सिलेंडर आता मोदींजींच्या काळात फक्त ९१३ रुपयांना मिळत असतानाही त्यांना चूल फुंकावी लागत असल्याने त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे, अशी उपरोधिक टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
मोदींजींच्या सरकारचे एक यश आहे की, बोंब मारण्यासाठी का असेना यशोमतीताई आणि काँग्रेस नेत्यांना इफ्तार ऐवजी फेटे वैगेरे बांधून हिंदूंचा सण जाहीरपणे साजरा करावा लागला! यशोमती ठाकूर यांचे काहीच चुकले नाही. त्या राहुल ब्रिगेडच्या विशेष मर्जीतील नेत्या आहेत. भारतीय राजकारणात राहुल गांधी पॅटर्न स्पष्ट झाला आहे. गोंधळ घाला, भीती पसरवा, भ्रम निर्माण करा, अफवा फैलवा आणि तरीही काही जमलं नाही तर संसदेला आणि जनतेला भरकटवा. युद्धजन्य स्थितीत भाजपाला विरोध करता करता आपण भारताचा विरोध करीत आहोत, याचे भान राहुल ब्रिगेडला नाही. हाच पॅटर्न त्यांनी अमरावतीत राबवला. त्यांचे खोटे उघड होते आणि ते वारंवार तोंडावर पडतात पण बिचारे आदत से लाचार आहेत ! गुढी पाडव्याला शिमगा समजून बिचारे बोंबा ठोकत बसले!, अशी टिका शिवराय कुळकर्णी यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी