
बीड, 21 मार्च (हिं.स.)।
बीड जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी रुग्णालयाची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध विभागांना भेट देत स्वच्छता, रुग्णसेवा आणि शिस्त याबाबत सखोल आढावा घेतला.
पाहणीदरम्यान डॉ. सोळंके यांनी रुग्णालयातील स्वच्छतेच्या बाबतीत विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. 'रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छतेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, '
स्वच्छतेला प्राधान्य, रुग्णसेवेत सुधारणा आणि तंबाखू सेवनावर कडक भूमिका
त्यांनी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. काही रुग्णांनी उपचार आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर काहींनी लहानसहान अडचणी मांडल्या. त्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या. तसेच रुग्णालय परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रुग्णालय हे आरोग्य संवर्धनाचे ठिकाण आहे. येथे तंबाखू सेवन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पाहणीदरम्यान आपत्कालीन विभाग, औषध वितरण कक्ष, प्रसूती विभाग तसेच विविध वॉर्ड्सची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी आवश्यक सुधारणा सुचवून त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ. सोळंके यांच्या या अचानक पाहणीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून, एकंदरीत आरोग्य सेवा अधिक चांगली करण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis