
अमरावती, 21 मार्च (हिं.स.)
विश्वमांगल्य सभेच्या स्थापनेस यंदा १५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभेच्या वतीने दोन दिवसीय मातृ संस्कार अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे येत्या २८ व २९ मार्चला विसावा भक्तनिवास संकुल, बाळापूर मार्ग येथे होत आहे. प्रांतीय अधिवेशनात हजारो महिला कार्यकर्त्यां सहभागी होणार आहेत.
स्थानिक राजापेठ येथील अमरावती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत विश्वमांगल्य सभेच्या पदाधिकारी डॉ. वसुधा बोंडे, अंजली देव, प्रा. डॉ. स्मिता देशमुख आदींनी विश्वमांगल्य सभेच्या मातृ संस्कार अधिवेशनाची माहिती दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, विश्वमांगल्य सभेच्या स्थापनेस यावर्षी १५ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मातृ संस्कार या विषयावर विशेष अधिवेशन शेगांव येथे होत आहे. २८ व २९ मार्च या दोन दिवसीय अधिवेशनात विभागासोबतच विदर्भातील हजारो महिला कार्यकर्त्यां सहभागी होणार आहेत. सदर अधिवेशनास अमरावती येथून ७५० महिला सभागी होणार आहे. महिला व मातांनी या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रपरिषदेला पूजा चव्हाण, रश्मी जाजोदिया, रश्मी इटकीकर, लता कोल्हे आदी उपस्थित होत्या.
मातृ संस्कार अधिवेशनात अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज मातांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय सुरेश हावरे उपस्थित मातांना संबोधित करणार आहेत. मुख्य अतिथी कोमल झंवर यांच्या हस्ते सप्त मातांना सन्मानित करण्यात येणार आहे. अधिवेशनात भारतीय जीवनचर्येवर आधारित भजन, भ्रमण, भवन, भोजन, भूषा व भाषा यावर चर्चा होणार आहे. याशिवाय संस्कार, सामर्थ्य, सदाचार व सेवा या मूल्यांवर आधारित सदर अधिवेशन असल्याने यावर देशभरातील विद्वान मार्गदर्शन करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी