
अमरावती, 21 मार्च (हिं.स.) अमरावती महानगरातील साफसफाई व स्वच्छतेच्या कामाचे नियोजन पुर्णतः फसले आहे. जुन्या कंत्राटदारांना बाद करीत नविन कंत्राटदार नियुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रक्रियेला खिळ बसली आहे. पाचही झोनमधील स्वच्छतेच्या कामासाठी पुरेशी यंत्रणा कंत्राटदार उभी करू न शकल्याने बोजवारा उडाला असून जागोजागी कचऱ्याचे ढीगारे साचू लागले आहेत. या मुद्दयावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही आता आपल्या तलवारी म्यान केल्याने संशयाचे वलय निर्माण झाले आहे. कचरा वहन व प्रभागांतील दैनंदिन कचरा संकलनासह साफसफाईसाठी महापालिका प्रशासनाने कोणार्क इन्फ्रा या कंपनीस कंत्राट दिला आहे. दोन्ही कामासाठी वार्षिक ४० कोटी रूपये त्यासाठी मोजण्यात येणार असून सात वर्षासाठी कंत्राट देण्यात आला आहे. त्यासाठी लागणारा पैसा महापालिका नागरिकांच्या खिशातून दरमहा ६०० रूपये दराने वसूल करीत आहे. मालमत्ताकराच्या देयकांत त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. इंदूर नगरी प्रमाणे अमरावती महानगर स्वच्छ करण्याचे स्वप्न दाखवत प्रशासनाने नविन कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कचरा वहनाचा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाचही झोनमधील दैनंदिन कचरा संकलनासह साफसफाईचा कंत्राट देण्यात आला आहे. झोन क्र १ व झोन क्र ५ च्या कामास १४ मार्चपासून प्रारंभ झाला असून त्यापुर्वी उर्वरित तीन झोनमधील कामास सुरूवात झाली आहे. या तीन झोनमधील कामासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री कंत्राटदार आतापर्यंत उपलब्ध करू शकलेला नाही. निविदेतील अटी व शर्तींचे पालन करण्यात कंत्राटदार पुर्णतः अपयशी ठरला आहे. तर, १४ मार्चपासून सुरू झालेल्या दोन झोनमधील कामासाठी मनुष्यबळही या कंत्राटदारास मिळू शकलेले नाही. नुकत्याच १७ मार्चला झालेल्या आमसभेत स्वच्छतेचा मुद्दा जाणीवपुर्वक वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यावर चर्चाच झाली नाही. सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूने या मुद्दयावर भाष्य झाले नाही. काही नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूने चुप्पी साधण्यात आल्याने संशयाचे वलय निर्माण झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या बड्या नेत्याचे कंत्राटदारास अभय असल्याने प्रशासनासह सभागृहाकडून चुप्पी साधण्यात येत असल्याची चर्चा रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी