
पुणे, 21 मार्च (हिं.स.)।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्यापासून २० दिवसांमध्ये तब्बल २७ हजार ८४० मालमत्ता कर थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेत भरलेल्या मालमत्ता कराची रक्कम तब्बल ८० कोटींहून अधिक आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ (रात्री १२ पर्यंत) सुरू राहणार असून, अद्याप ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर भरणे बाकी आहे, अशा थकबाकीदारांनी दिलेल्या मुदतीत मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना १ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शुल्कावर ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. सदर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक असून, या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अभय योजना लागू झाल्यापासून १ मार्च २०२६ (सकाळी १० पासून) ते २० मार्च २०२६ (दुपारी १२ पर्यंत) या २० दिवसांच्या काळात तब्बल २७ हजार ८४० मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत ८० कोटीहून अधिक रक्कम जमा झाली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना १९ कोटी १५ लाखांची सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे.महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर कर संकलन झाले आहे. तसेच काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकीत रकमेचा भरणा झालेला नसून, अशा मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेच्या ‘अभय योजना’चा लाभ घेऊन ३१ मार्च २०२६ पूर्वी थकीत मालमत्ता कर भरून विलंब शुल्कावर ९० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु