
बीड, 21 मार्च (हिं.स.)।
तापमानात झपाट्याने वाढ होत असून उष्मालाटेचा धोका निर्माण झाला आहे. दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवत असून, याकाळात घराबाहेर पडणे टाळावे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि त्रस्त आजाराने असलेल्या व्यक्तींनी अधिक दक्षता बाळगावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
यासोबतच ताक, लिंबूपाणी, फळांचे रस यांचा आहारात समावेश करावा. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे, तसेच हलके व सैल कपडे परिधान करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात दीर्घकाळ राहणे टाळावे, रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत
वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राणी एकटे सोडू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे. उष्मालाटीची लक्षणे वेळेत ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, डोकेदुखी, मळमळ किंवा शरीराचे तापमान अचानक वाढणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित राहावे, 'आपली सुरक्षा-आपली जबाबदारी' हे लक्षात ठेवून उष्णतेपासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis