कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख - डॉ.योगेश क्षीरसागर
बीड, 21 मार्च (हिं.स.)। गेली तीन दशके बीड जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख सर्वदूर करणारा कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख असून मोठे कलावंत देखील आम्ही या महोत्सवात कला सादर केल्याचे अभिमानाने सांगतात, आता हा महोत्सव अधिक व्यापक व्हावा, असे प्रतिपादन
Q


बीड, 21 मार्च (हिं.स.)।

गेली तीन दशके बीड जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख सर्वदूर करणारा कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख असून मोठे कलावंत देखील आम्ही या महोत्सवात कला सादर केल्याचे अभिमानाने सांगतात, आता हा महोत्सव अधिक व्यापक व्हावा, असे प्रतिपादन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

तिसावा कनकालेश्वर महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे कनकालेश्वर मंदिराच्या परिसरात आणि जलाशयातील तरंगत्या रंगमंचावर संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजप युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, संस्कार भारती देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष देवेंद्र कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास यावेळी ज्येष्ठ नेते नवनाथ शिराळे संरक्षक भरत लोळगे, रंगकर्मी कुलदीप धुमाळे प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे, गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर नगरसेवक आदित्य माने नगरसेवक शुभम धूत, नगरसेवक गोविंद शिराळे शांतिनाथ डोरले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बीड जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा आहे संस्कार भारती ने कंकालेश्वर महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे आम्ही संस्कार भारतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत यावेळी शंकर देशमुख यांनी व्यक्त केले तर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बोलताना हा कनकालेश्वर महोत्सव जागतिक पातळीवर पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून क्षीरसागर परिवाराने या महोत्सवाला सदैव पाठबळ दिल्याचे सांगितले.

रंगकर्मी कुलदीप धुमाळे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा सरसंघचालक यांच्या चरीत्रावर आधारित 'अवतरले पंचसंन्यासी योद्धे' ही नाटिका यावेळी सादर करण्यात आली, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैया, सुदर्शन आणि मोहन भागवत यांचे हुबेहूब दर्शन यावेळी ज्येष्ठ रंगकर्मींनी सादर केले.

निखिल देडे आणि त्यांच्या सहकलाकारांनी 'शिवपिंगळा' हा हा लोप पावत चाललेला प्रकार सादर केला . ब्रम्हमुहूर्तावर दारोदारी येऊन जनजागृती करणारा पिंगळा हा लोकलेतील प्रकार असून पहाटे याच समयी पिंगळा हा पक्षी सुध्दा उठून साद घालतो आणि याच वेळी लोककलावंत पहाटे हातात कंदील आणि टाळ घेऊन भक्तीगीते,लोकगीते गायची म्हणून यास 'पिंगळा 'म्हणतात असे सांगून देठे यांनी पोवाडा,गोंधळ आदी प्रकार सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते शिवराज्याभिषेक हा संपूर्ण प्रसंग देखील निखिल देडे आणि सहकाऱ्यांनी रसिकांसमोर आणला .शिवपिंगळा म्हणजे काय आणि ही लोप पावत चाललेली संस्कृती जतन करण्यासाठी हे कलाकार घेत असलेली मेहनत या माध्यमातून दिसून आली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande