
छत्रपती संभाजीनगर, 21 मार्च (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापनशास्त्र विभागात “मेंटल नॉईस टू इनर क्लॅरिटी” या विषयावर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पियम उषा सॉफ्ट कॉम्पोनंट ऍक्टिव्हिटी सेल आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व्यवस्थापन, एकाग्रता वाढविणे आणि अंतर्गत स्पष्टता विकसित करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. अभिजीत शेळके तसेच पियम उषा सॉफ्ट कॉम्पोनंट ऍक्टिव्हिटी सेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल व परिणामकारक मार्गदर्शन केले. डॉ. भगवान बोचरे यांनी ओव्हरथिंकिंग या विषयावर भाष्य करत, सतत विचारांच्या गर्दीत अडकण्याची कारणे आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या. डॉ. शमीम सय्यद आणि डॉ. निशिगंधा व्यवहारे यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करत, तणावाचे प्रकार, त्याची लक्षणे तसेच दैनंदिन जीवनात तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त तंत्रे सांगितली.डॉ. मुक्तार शेख यांनी चिंता (Anxiety) या विषयावर बोलताना चिंता आणि भीती यामधील फरक स्पष्ट करून, योग्य समुपदेशन आणि सकारात्मक दृष्टिकोनातून चिंतेवर मात कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. संतोष भुतेकर यांनी एक्झाम स्ट्रेस या विषयावर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले.तसेच प्रा. महेश खरे (सहायक प्राध्यापक मानसशास्त्र विभाग) यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत, ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या साहाय्याने मानसिक गोंधळ कमी करून अंतर्गत स्पष्टता कशी मिळवता येते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या सर्व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना मानसिक संतुलन राखून यशाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis