
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)।
गेल्या काही दिवसांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोईत वाढ झाली आहे. महावितरण याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानात वाढ होत आहे. शहरासह कांडली व इतर बऱ्याच ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याची ओरड आहे. तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठामुळे नागरिकांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. वरिष्ठ याकडे लक्ष देणार का? तसेच विद्युत देयकांची वसुली जेवढ्या तत्परतेने केल्या जाते तेवढ्या तत्परतेने ग्राहकांना सेवा का दिला जात नाही? असे सवाल विद्युत ग्राहक विचारत आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला होता, तो दुरुस्त करण्यात आला असून पूर्ववत वीजपुरवठा सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी