
लातूर, 27 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काचे विक्री व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या “उमेद हिरकणी हाट” जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. २१ ते २६ मार्च या कालावधीत भरलेल्या या प्रदर्शनाला लातूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सहा दिवसांच्या कालावधीत महिला बचत गटांनी तब्बल ७२.८६ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल करत आपले कर्तृत्व सिद्ध केले. जिल्ह्यातील तसेच बाहेरील विविध तालुक्यांमधून सहभागी झालेल्या महिलांनी हस्तकला, खाद्यपदार्थ, सेंद्रीय शेती उत्पादने, गृहोद्योग वस्तू आणि ताज्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे एकूण १०६ स्टॉल आकर्षक पद्धतीने उभारले होते.
समारोप कार्यक्रमास प्रकल्प संचालक संजय इंगळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट स्टॉल सजावट, स्वच्छता, ग्राहकांशी संवाद कौशल्य आणि नाविन्यपूर्ण सादरीकरण यावर आधारित पारितोषिके देण्यात आली. तसेच सर्वाधिक विक्री करणाऱ्या बचत गटांचाही गौरव करण्यात आला.
प्रकल्प संचालक संजय इंगळे यांनी सांगितले की, उमेद अभियानामुळे ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून “हिरकणी हाट” हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पुढे जिल्हा परिषद आवारात बचत गटांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी “हिरकणी मॉल” लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनीही महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात काही स्टॉलधारक महिलांनी आपले अनुभव मांडले.
या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, व्यवस्थापक आणि समन्वयकांनी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत श्रीमंगले यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis