
रत्नागिरी, 27 मार्च, (हिं. स.) : पुणे येथे झालेल्या ‘ग्लोबल गौटेक समिट २०२६’ मध्ये चिपळूण येथील अनिकेत अनिल बापट यांना ‘गौटेक २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या चार दिवसीय समिटमध्ये गोआधारित विविध विषयांवर देशभरातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध गोआधारित स्टॉल्स, देशी गोवंश प्रदर्शन तसेच विविध प्रजातींची माहिती नागरिकांना देण्यात आली.मानवी आरोग्य, शेती, पर्यावरण आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये देशी गाईचे महत्त्व अधोरेखित करताना महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे प्रमुख शेखर मुंदडा, डॉ. कुलकर्णी आणि डॉ. वल्लभ कतारिया यांनी मार्गदर्शन केले. चार राज्यांच्या गौसेवा आयोगाचे प्रमुख, लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे हेही यावेळी उपस्थित होते.
अनिकेत बापट चिपळूणमधील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल आणि डी. बी. जे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून पंचगव्य व निसर्गोपचार या क्षेत्रातील पुढील शिक्षण त्यांनी कोल्हापूर, नाशिक आणि तामिळनाडू येथे घेतले आहे.पुरस्कार स्वीकारताना अनिकेत बापट म्हणाले, हा सन्मान माझ्या आई-वडिलांचे संस्कार, गुरुजनांची शिकवण आणि अमृतरूपी पंचगव्य देणाऱ्या गोमातेचा आहे.अनिकेत बापट २०१६ पासून कोकण कपिला गोसंवर्धन, दर्जेदार पंचगव्य उत्पादन निर्मिती, पंचगव्य आधारित चिकित्सा, गोआधारित शेती, गोकृपा अमृत कल्चरचे मोफत वाटप, महाराष्ट्रभर गोमहात्म्याचा प्रचार-प्रसार, पंचगव्य प्रशिक्षण तसेच विविध गोशाळांना मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी