
नाशिक, 27 मार्च (हिं.स.) : म्हाडा भूखंड अपहर प्रकरणात नाशिक न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत 45 बिल्डरांनी दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. या निर्णयामुळे संबंधित नामांकित बिल्डरांच्या अटकेची शक्यता वाढली असून, पोलिसांकडून कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात नाशिक शहरातील काही बडे बिल्डर, महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून, 22 विविध पथकांद्वारे संशयित आरोपींचा शोध सुरू होता.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींनी नाशिक न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. यात विक्रम कपाडिया, अभिषेक ठक्कर, महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, राहुल लुनावत, आशा बनकर आणि सचिन वाघमारे यांचा समावेश होता.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व 45 आरोपींचे जामीन अर्ज नाकारले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सांगळे यांनी युक्तिवाद मांडला, तर तपास अधिकारी आंचल मुंदगल यांनी न्यायालयासमोर प्रकरणासंबंधी सविस्तर माहिती सादर केली.
तपासादरम्यान तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, सुमारे 2000 चौरस मीटर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तपास अधिक वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV