
परभणी, 27 मार्च (हिं.स.) : शहरातील मारुती मंदिरातील मूर्ती आणि पंचरंगी ध्वज हटविण्यात आल्याच्या घटनेवरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत महानगरपालिकेला निवेदन सादर केले आहे. या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
भाजपाचे नगरसेवक गणेश उर्फ बबलू टाक, रितेश झांबड, विश्वजित बुधवंत, डॉ. केदार खटींग, मीनाताई वरपुडकर, निर्मला वाघमारे, गिरीजा आजेगांवकर, वैशाली दैठणकर, सुशिला थोरात, सपना जुकटे आणि अद्वैत पार्डीकर यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मारुती मंदिरातील मूर्ती हटविण्याची घटना अत्यंत निंदनीय असून यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे हिंदू समाजाच्या स्वाभिमानाला धक्का बसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. येत्या हनुमान जयंतीपूर्वी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून ती पूर्ववत ठिकाणी बसवावी आणि योग्य मान-सन्मान द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर तीन दिवसांच्या आत कठोर कारवाई करावी, अन्यथा 1000 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह तक्रार देऊन संबंधित धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, शहरातील स्वच्छतेच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. कचरा संकलन व्यवस्था नियमित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कचरा गाड्या आणि ट्रॅक्टर वेळेवर येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास महानगरपालिका प्रांगणात आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis