पाथरी नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
परभणी, 27 मार्च (हिं.स.) : पाथरी नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार वादावादी झाल्याची घटना समोर आली. विरोधकांनी प्रत्येक ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली असली, तरी नगराध्यक्षांनी ती फेटाळून लावत
पाथरी नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी


परभणी, 27 मार्च (हिं.स.) : पाथरी नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार वादावादी झाल्याची घटना समोर आली. विरोधकांनी प्रत्येक ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली असली, तरी नगराध्यक्षांनी ती फेटाळून लावत बैठक अचानक गुंडाळल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.

पालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता बैठकीस प्रारंभ झाला. या वेळी नगराध्यक्ष आसेफ खान, कार्यालयीन अधीक्षक अशोक वाघुम्बरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी विविध विषय सभागृहासमोर मांडले. मात्र, स्वीकृत सदस्य तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला.

विशेषतः अर्थसंकल्पीय बैठकीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना नगराध्यक्षांनी सांगितले की, 16 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीस विरोधी सदस्य अनुपस्थित होते, त्यामुळे त्या विषयांवर पुन्हा चर्चा करता येणार नाही.

यानंतर इतर विषय मांडले असता दुर्राणी यांनी प्रत्येक ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली. मात्र, नगराध्यक्षांनी ही मागणी नाकारून ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले आणि बैठक गुंडाळली.

दरम्यान, सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना नगराध्यक्ष आसेफ खान यांनी सर्व ठराव बहुमताने मंजूर झाल्याचा दावा केला. तर बाबाजानी दुर्राणी यांनी सत्ताधारी पक्षाकडे सभागृहात बहुमतच नव्हते, असा आरोप करत नगराध्यक्षांनी बैठक चुकीच्या पद्धतीने हाताळल्याची टीका केली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande