
परभणी, 27 मार्च (हिं.स.) । निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका बीएलओविरुद्ध तहसील कार्यालयाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात सध्या मतदार यादीच्या सखोल पुनर्निरीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सन 2002 च्या मतदार यादीतील नावे सन 2024 च्या यादीशी मॅपिंग करण्याचे महत्त्वाचे काम सुरू असताना मतदान केंद्र क्रमांक 96/222 वर बीएलओ म्हणून नियुक्त असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शाळेतील शिक्षक सय्यद फरहान सय्यद रहीम यांनी 13 मार्च रोजी गैरहजेरी लावली.
यानंतर त्यांनी मतदार पुनर्निरीक्षणाशी संबंधित कोणतेही काम केले नाही. निवडणूक विभागाकडून त्यांच्याशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही तसेच मोबाईल बंद ठेवला.
या पार्श्वभूमीवर मतदारांना महत्त्वाच्या मॅपिंग प्रक्रियेपासून वंचित ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि कामात हलगर्जीपणा करणे या कारणांवरून नायब तहसीलदार सुनील जयराम कांबळे यांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1934 अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बीएलओविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, निवडणूक कामात कसूर करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशारा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. संदीप राजापूरे यांनी दिला आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis