
पुणे, 27 मार्च (हिं.स.) : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) प्रशासनाने ऑनलाइन तिकीट विक्रीला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक ‘हायटेक’ करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अधिकृत ‘आपली पीएमपीएमएल’ ऍप आतापर्यंत २४ लाख प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे.
या संख्येत वाढ करून ५० लाख डाउनलोडपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले असून, त्यासाठी एप्रिल महिन्यात विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्य भर प्रवाशांना ॲपबाबत माहिती देणे आणि त्याचा वापर सुलभ करणे हा असेल.
प्रवाशांना ऍप डाऊनलोड करणे सोपे व्हावे यासाठी प्रशासनाकडून लवकरच मार्गदर्शक स्टिकर्स प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. हे स्टिकर्स शहरातील प्रमुख बसथांबे, बसमधील आसनव्यवस्था तसेच बसच्या बाहेरील भागावर लावण्यात येतील.
या स्टिकर्सवर ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार असून, तो स्कॅन केल्यावर प्रवाशांना थेट ‘आपली पीएमपीएमएल’ ऍप डाऊनलोड करता येणार आहे
--------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु