चंद्रपूर मनपाचा ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर
चंद्रपूर, 27 मार्च (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर यांना सादर केला. शहराच्य
चंद्रपूर मनपाचा ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर


चंद्रपूर, 27 मार्च (हिं.स.)।

चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ७४६ कोटींचा आणि २८ कोटी ७६ लक्ष रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर यांना सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा यावर विशेष भर देण्यात आला आहे.

अर्थसंकल्प सादर करताना सभापती यांनी सांगितले की, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना व प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुखतः अमृत 2.0 अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ८० कोटी, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी १०० कोटी, तसेच रस्ते बांधकामासाठी ३ कोटी आणि नाली बांधकामासाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे तसेच कुठल्याही करात वाढ करण्यात आलेली नाही.

अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी आणि विकासकामे:

१. जलप्रदाय आणि मलनिस्सारण (अमृत २.०):

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी अमृत २.० अभियानांतर्गत ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी अमृत मल:निस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे शहराच्या स्वच्छतेत मोठी सुधारणा होणार आहे.

२. आरोग्य सेवांचे आधुनिकीकरण:

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरिता २२.४९ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयांचे सक्षमीकरण आणि औषधोपचारांसाठी हा निधी खर्च केला जाईल.

३. सामाजिक न्याय आणि समावेशक विकास:

महिला व बालकल्याण (G-Budget): महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांच्या विकासासाठी २.२८ कोटी रुपयांच्या विविध योजना राबवल्या जातील.

दिव्यांग कल्याण: शासन निर्णयानुसार ५% निधी राखून ठेवत दिव्यांगांच्या कल्याणासाठी १.४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

आर्थिक मागास घटक (P-Budget): आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी १.५० कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

४. शहर सौंदर्यीकरण व पर्यावरण:

चंद्रपूरला सुंदर आणि हरित करण्यासाठी चौक सौंदर्यकीकरणासाठी १ कोटी, तर शहर सौंदर्यकीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. 'माझी वसुंधरा' अभियान आणि ई-बस सेवेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल.

५. रस्ते सुरक्षा व जनजागृती करीता - ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

६. कंत्राटी कर्मचारी मानधन - १४. ८७ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.

७. रस्ते आणि पायाभूत सुविधा:

शहरातील रस्ते दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी ३ कोटी, पथदिव्यांच्या देखभालीसाठी ३ कोटी आणि प्रभाग स्तरावरील नाली बांधकामासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

८. नगरसेवक स्वेच्छा निधीत वाढ:

स्थानिक प्रभागातील तातडीची कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीत वाढ करण्याची मागणी महापौर व सभापतींनी मान्य केली. पूर्वीचा ५ लाख रुपयांचा निधी आता १५ लाख रुपये (प्रति नगरसेवक) करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

९. अंत्यविधी अनुदानात वाढ -

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गरीब व निराधार कुटुंबांना अंत्यविधीसाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना अंत्यविधीसाठी २ हजार रुपये दिले जात होते त्यात आता वाढ करून ३ हजार रुपये करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे.

उत्पन्नाचे अपेक्षित स्रोत:

मालमत्ता कर व इतर करातून ४५.४७ कोटी, सफाई शुल्क ७.८० कोटी, उपयोगिता शूल्क १२ कोटी, वाढीव चटई क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम परवानगी प्रदान करणे यातून ९ कोटी, खासगी बांधकामे, फ्लॅट नियमानुकूल करणे गुंठेवारी शुल्क १ कोटी, जीएसटी सहायक अनुदानातून १०८.६० कोटी प्राप्त होणे बाकी आहे. १५ वा वित्त आयोग १५ कोटी अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे. मनपाच्या इमारती, गोळे भाड्यातून ३ कोटी, पाणीपुरवठा कर ६ कोटी, प्रधानमंत्री आवास योजना, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नगरोत्थान अभियान, अमृत, वैशिष्टपूर्ण योजना, रस्ता अनुदान, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण, आमदार व खासदार निधी, मुलभूत सोयीसुविधा, प्रधानमंत्री खनिज शेत्र, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम व नवीन ठक्करबाबा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतून ४०३.४९ कोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

या सर्वसाधारण सभेला माननीय महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव,स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, आयुक्त अकुनुरी नरेश, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी,शहर अभियंता रवींद्र हजारे तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका आणि मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande