
परभणी, 27 मार्च (हिं.स.) दिव्यांग बांधव ज्या भागात राहतात तेथील प्रशासकीय यंत्रणेकडे त्यांनी व्यवसायासाठी जागेची मागणी करावी, असे आवाहन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले. दिव्यांगांच्या प्रश्नावर नुकताच आ. डॉ. पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याबद्दल दिव्यांग बांधवांच्या वतीने आ. डॉ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
2006-2007मध्ये तत्कालीन सरकारने दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा देण्याचे आदेश काढले होते. या आदेशानुसार दिव्यांगांना ते राहत असलेल्या ठिकाणी दर्शनी भागात 200 फुटाची जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतू गेल्या 19 वर्षात मराठवाड्यातील कोणत्याही दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा मिळाली नसल्याचे आ.डॉ.पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावर मंत्री अतुल सावे यांनी मुंबईसह अन्य शहरात अशा प्रकारच्या जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. परभणी जिल्ह्यात दिव्यांगांना जागा मिळाली नसल्यास त्याची चौकशी करून मागेल त्या दिव्यांगांना जागा देण्यात येईल असे आश्वासन दिले. या पार्श्वभुमीवर आ. पाटील म्हणाले की, दिव्यांग बांधवांनी व्यवसायासाठी दर्शनी भागात 200 स्क्वेअर फूट जागा पाहिजे असल्यास महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावेत. काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करावा. आपण या प्रश्नावर पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना जागा मिळवून देऊत असे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी दिव्यांग बांधवांनी आ. पाटील यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. आ. पाटील दिव्यांगांचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी लावून धरत आहेत. आ. पाटील यांच्या पाठींब्यामुळे दिव्यांग बांधव सक्षम होत असल्याचे मत यावेळी दिव्यांग बांधवांनी व्यक्त केले. यावेळी रामराव डोंगरे, नवनीत पाचपोर, बंडू बीडकर, प्रकाश जाधव, विष्णू वैरागड, विलास राठोड, महेंद्र फुटाणे, गंगाधर गाडगे यांच्यासह दिव्यांग बांधव संजय वाघमारे, राहुल शिवभगत, शैलेश नवघडे, माऊली भरोसे, ज्ञानबा कदम, पाईकराव, गणेश शिंदे, ज्ञानोबा ढाले, अनिल पामे, सुरेश पाचपुंजे, गजानन दुधारे, ज्ञानदेव ढाले, एस. के. अहमद, गजानन गारूडे, नारायण धुमाळ, मदन निर्वळ, शेख फजल, खलील खान, सदाशिव पांचाळ, भगवान जल्हारे, दिलीप सौदागर, रमेश खंडागळे, सोनबा पाईकराव, सुमीत गोरे व शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis