
अमरावती, 27 मार्च (हिं.स.) : अमरावती शहरात एमडी (MD) ड्रग्सचा वाढता प्रभाव अत्यंत चिंताजनक बनत असून, तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या नशेमध्ये अडकत असल्याचे चित्र समोर येत आहे. अलीकडील पोलीस कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले असून, शहरात वारंवार मोठ्या प्रमाणावर छापेमारी होत आहेत.
तपासात समोर आले आहे की या रॅकेटचा गुजरात आणि राजस्थानशी संबंध आहे. त्यामुळे या ड्रग्स पुरवठ्याचा मुख्य सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी सखोल तपासाची मागणी करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमरावती एमडी ड्रग्सचे मोठे केंद्र (हब) बनण्याच्या मार्गावर आहे. अलीकडील कारवायांनुसार, मोठ्या प्रमाणावर ट्रकद्वारे ड्रग्स शहरात येत असून, येथून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे वितरण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या वाहतुकीचा संपूर्ण मागोवा घेऊन ड्रग्स पुरवठ्याची साखळी उद्ध्वस्त करण्याचे पावले उचलणे गरजेचे आहे.
यासंदर्भात विशेष पथक नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गृह विभागाकडे तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, शहरातील वाढत्या ड्रग्स प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी