अमरावती - परिमंडळातील आरोग्य संस्थांवर ४.२० कोटींचे वीज बिल थकीत
अमरावती, 27 मार्च, (हिं.स.) अमरावती परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीजपुरवठा असलेल्या शासकीय आरोग्य संस्थांकडे एकूण ४ कोटी २० लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी संबंधित रुग्णालय प्रशासनाने तातडीने
परिमंडळातील आरोग्य संस्थांवर ४.२० कोटींचे वीज बिल थकीत; महावितरणचा इशारा


अमरावती, 27 मार्च, (हिं.स.) अमरावती परिमंडळातील उच्चदाब व लघुदाब वीजपुरवठा असलेल्या शासकीय आरोग्य संस्थांकडे एकूण ४ कोटी २० लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी संबंधित रुग्णालय प्रशासनाने तातडीने थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, वीज बिल वसुली ही केवळ आर्थिक बाब नसून संस्थेच्या अस्तित्वाशी संबंधित आहे. त्यामुळे कर्मचारी भर उन्हात थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य सेवा ही जीवनवाहिनी असल्याची जाणीव ठेवून महावितरणने शासकीय रुग्णालयांचा वीजपुरवठा तातडीने खंडित न करता संबंधित प्रशासनाशी प्रत्यक्ष भेटी, पत्रव्यवहार व स्मरणपत्रांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले.

परिमंडळातील उच्चदाब वर्गवारीतील नऊ महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये थकबाकीची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येते. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. अचलपूर येथील वैद्यकीय अधीक्षक यांच्या नावे असलेल्या तीन वीज जोडण्यांवर १ कोटी १४ लाख रुपयांचे बिल थकीत आहे, तर मोर्शी येथील संबंधित खात्यावर १.१८ लाख रुपये बाकी आहेत.

याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन वीज जोडण्यांवर ५६ लाख रुपये थकीत आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकडे ८ हजार रुपये, तर मेडिकल अधीक्षक यांच्या नावावर ५९ लाख ३० हजार रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणने सांगितले.

दरम्यान, लघुदाब वर्गवारीतील आरोग्य यंत्रणेच्या १५२ वीज जोडण्यांवर एकूण ४४ लाख २८ हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ९९ ग्राहकांकडे ११ लाख ९ हजार रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यातील ५३ ग्राहकांकडे ३३ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे.

संबंधित रुग्णालय प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य ठरेल, असा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande