
रायगड, 27 मार्च (हिं.स.) – शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग, जिल्हा नियोजन कार्यालय तसेच जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या वतीने अलिबाग बस स्थानक, अलिबाग समुद्रकिनारा तसेच बामणगाव आदी ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्यांद्वारे नागरिकांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘माझी कन्या भाग्यश्री’, ‘मुद्रा लोन योजना’, ‘कौशल्य विकास योजना’ आणि ‘घरकुल योजना’ अशा विविध शासकीय योजनांची माहिती सोप्या व प्रभावी भाषेत देण्यात आली. कलाकारांनी सादर केलेल्या संवाद आणि प्रसंगांमुळे नागरिकांना योजनांचे महत्त्व आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याची स्पष्ट माहिती मिळाली.
या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. या पथनाट्यात सुचित जावरे, कोमल परब, अंजली पेडणेकर, वैष्णवी पाटील, सायली ठाकूर, जान्हवी ठाकूर, महिमा शिपाई, तन्वी कदम आदी कलाकारांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे शासकीय योजनांविषयी जनजागृती वाढण्यास मदत होत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)