971 रिक्त पदांचा भार; रायगडच्या शिक्षण व्यवस्थेची दमछाक
रायगड, 27 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल 971 पदे रिक्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्थेवर ताण वाढला असून अनेक शाळांमध्ये प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्हा परिष
Load of 971 vacant posts; Raigad's education system is in a state of suffocation


रायगड, 27 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल 971 पदे रिक्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्थेवर ताण वाढला असून अनेक शाळांमध्ये प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे एकूण 6 हजार 729 पदे मंजूर असून त्यापैकी 5 हजार 758 पदे भरलेली आहेत. मात्र, उर्वरित पदे रिक्त असल्यामुळे शिक्षक आणि अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.

रिक्त पदांमध्ये विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मुख्याध्यापकांची 92 पदे रिक्त असल्यामुळे अनेक शाळा प्रमुखांविना सुरू असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक शिक्षकांची तब्बल 688 पदे रिक्त असून केंद्रप्रमुखांची 145 पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नांना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत शिक्षक व अधिकाऱ्यांवर दुहेरी जबाबदारी येत आहे. एकीकडे नियमित अध्यापन आणि दुसरीकडे विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना त्यांची मोठी कसरत होत आहे. दरम्यान, या रिक्त पदांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. शिक्षकांची पदे सरळसेवा भरतीद्वारे, तर इतर पदे पदोन्नती व विभागीय प्रक्रियेद्वारे भरली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक पदांच्या भरतीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून निर्णयानंतरच पुढील कार्यवाही होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande