
अमरावती, 27 मार्च (हिं.स.)
शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला नवा आणि सकारात्मक अर्थ देत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या शेतकरी ऐक्याला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला महादेव जानकर,विजय जावंधिया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत शेतकरी प्रश्नांवरील पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली.कर्जमाफीच्या आंदोलनात सातत्याने सहभागी असलेल्या परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये कार्यकर्त्यांची सेवा करणारे संजय गोमकाळे यांची बिजतुला करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे आंदोलनातील निस्वार्थी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या ताकदीमुळेच सरकारला नमावे लागले. आपण पूर्णपणे विजयी झालो नसून सुमारे ८० टक्के यश मिळाले आहे. लोक जाती-धर्मासाठी एकत्र येतात, मात्र शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूर आंदोलनावेळी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, तरीही एकही शेतकरी मागे हटला नाही, त्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असेही त्यांनी सांगितले.विजय जावंधीया यांनी शेतकरी परिस्थितीवर भाष्य करत, “दोन लाखांची कर्जमाफी झाली, पण आम्हाला माफी नको; कर्ज फेडण्याची ताकद हवी. ती ताकद शेतमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय येणार नाही,” असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत MSP प्रत्यक्ष बाजारात मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.वामनराव चटप यांनी कर्जमाफीच्या लढ्यात बच्चू कडू यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा निर्णय शक्य झाला, असे त्यांनी सांगितले.या वेळी बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. “आंदोलनात रक्त सांडले, पण लढा थांबला नाही. समाजाला जाती-धर्मात अडकवले जात असताना शेतकरी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठीच आपण रक्तदान केल्याचे सांगताना ते भावूकही झाले.दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देत बच्चू कडू यांनी सांगितले की, आता पुढील लढा थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौव्हान यांना घेरून लढला जाईल. शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी हा लढा निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी