
पुणे, 27 मार्च (हिं.स.) : सध्या पुण्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा दिसून येत आहेत. सरकारकडून इंधन तुटवडा नसल्याचे आणि पुरेसा साठा असल्याचे आश्वासन दिले असले तरीही नागरिकांच्या घाबरलेल्या खरेदीमुळे पंपांवर गर्दी होत आहे.
यावर प्रतिक्रिया देत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सर्व नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे आणि आसपासच्या भागात इंधनाची कोणतीही कमतरता नाही आणि सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. पुरवठा साखळीही व्यवस्थित कार्यरत असल्याचे सांगितले आहे.
असोसिएशनच्या मते, घाबरून केलेल्या अचानक खरेदीमुळे मागणीत अनावश्यक वाढ होत असून, यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण येतो आणि नागरिकांना तात्पुरती गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी संयम राखून इंधन खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु