मालेगाव मनपामध्ये डिजिटल उपक्रमात घोटाळा, सपाचा आरोप
मालेगाव, 27 मार्च (हिं.स.)। मालेगाव महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमात घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप समाजवादी पार्टीचे महापालिकेतील गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या उपक्रमासाठी आमदारांच्या स्थानिक व
मालेगाव मनपामध्ये डिजिटल उपक्रमात घोटाळा, सपाचा आरोप


मालेगाव, 27 मार्च (हिं.स.)।

मालेगाव महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमात घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप समाजवादी पार्टीचे महापालिकेतील गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या उपक्रमासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध झालेल्या पैशांतून बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दराने उपकरणे खरेदी झाल्याचा दावा करत डिग्निटी यांनी या प्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

मालेगाव महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत उर्दू व मराठी अशा एकूण १०५ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी ४० उर्दू शाळा 'डिजिटल क्लासरूम'मध्ये रूपांतरित करण्यासाठी आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून २ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून 'पीपुललिंक' कंपनीचे ७५ इंच आकाराचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले' (डिजिटल स्मार्ट बोर्ड) खरेदी करण्यात आले. मात्र, या खरेदीतील दर्जाबद्दल सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत, असे डिग्निटी म्हणाले.

पत्रकार परिषदेत माहिती देताना मुस्तकीम डिग्निटी म्हणाले की, बाजारात ज्या डिजिटल स्मार्ट बोर्डची किंमत जेमतेम १ लाख रुपये आहे, तोच बोर्ड शिक्षण मंडळाने चक्क ४ लाख ९९ हजार रुपये या दराने खरेदी केला आहे. आम्ही स्वतः हैदराबादस्थित संबंधित कंपनीकडे चौकशी केली असता, त्यांनी एका संचासाठी १ लाख रुपये दर सांगितला. जर ४० संचांची एकत्रित ऑर्डर दिली, तर हा दर आणखी १०-२० हजारांनी क होऊ शकतो, असे डिग्निटी म्हणाले. ४० शाळांच्या डिजिटल बोर्ड खरेदीत सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

या संदर्भात राबविण्यात आलेल्या खरेदी प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत का आणि जादा दराने ही खरेदी झाली आहे का, हे आधी तपासले जाईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी या संदर्भात बोलताना दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande