
परभणी, 27 मार्च (हिं.स.) : परभणी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीवरील काही निर्बंध प्रशासनाने काही तासांत मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना निर्बंधांविना पेट्रोल आणि डिझेल मिळू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर इंधन तुटवट्याबाबत अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले की, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
पूर्वीच्या तात्पुरत्या आदेशानुसार, दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त २,००० रुपयांपर्यंत इंधन देण्याचे निर्बंध होते. तसेच कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन विक्री करण्यास मनाई होती, जी काळाबाजार रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी केली होती.
सर्व पेट्रोल पंपांना प्रत्येक दिवस सकाळी शिल्लक साठा दर्शवण्याची सूचना देण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन आढळल्यास ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ नुसार कारवाई होईल आणि पंपाचा परवाना रद्द करण्यासह कडक फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी सांगितले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis