परभणीत बी.एड. सीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणी; अभाविपच्या आंदोलनानंतर परीक्षा पुढे ढकलली
परभणी, 27 मार्च 2026 (हिं.स.) : एमजीएम अकॅडमी, एमआयडीसी येथे आयोजित एमएचटी-सीईटी (बी.एड.) परीक्षेच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, ज्यामुळे परीक्षा सुरळीत सुरू होऊ शकली नाही. अनेक विद्यार्थ्यांचे संगणक अचानक बंद पडल
परभणीतील एमजीएम अकॅडमीत बी.एड. सीईटी परीक्षेत तांत्रिक बिघाड; परीक्षा पुढे ढकलली : अभाविपच्या लढ्याला यश


परभणी, 27 मार्च 2026 (हिं.स.) : एमजीएम अकॅडमी, एमआयडीसी येथे आयोजित एमएचटी-सीईटी (बी.एड.) परीक्षेच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, ज्यामुळे परीक्षा सुरळीत सुरू होऊ शकली नाही. अनेक विद्यार्थ्यांचे संगणक अचानक बंद पडल्याने परीक्षा वेळेत घेता आली नाही आणि विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या गंभीर परिस्थितीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी परीक्षा केंद्रावर ठिय्या आंदोलन आणि घोषणाबाजी करून केंद्र प्रशासन व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांना निवेदन दिले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सीईटी सेलने विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सीईटी सेलच्या परिपत्रकानुसार, 27 मार्च 2026 रोजी सकाळच्या सत्रातील बी.एड. सीईटी परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल आणि कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुधारित परीक्षेची तारीख 28 किंवा 29 मार्च 2026 अशी राहणार असून प्रवेशपत्र व वेळापत्रक ई-मेल व एसएमएसद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.

अभाविपच्या शहर मंत्री सेजल काळे यांनी याबाबत सांगितले की, “सीईटी सेलचा निर्णय स्वागतार्ह आहे, तरीही परीक्षेच्या दिवशी घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी व परीक्षा केंद्राच्या निष्काळजीपणामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित संस्थेवर कारवाई केली जावी आणि निष्काळजी परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत ठेवावे.”ते पुढे म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी अभाविप कटिबद्ध आहे आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. आवश्यक असल्यास पुढील टप्प्यात आंदोलन छेडण्यात येईल.”

-----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande