संजय राऊत जनतेमध्ये घबराट पसरवून इंधन साठेबाजी करण्यास भाग पाडत आहेत - नवनाथ बन
मुंबई, 27 मार्च (हिं.स.)। संजय राऊत हे इंधन, गॅस तुटवड्याबाबत घबराट पसरवत अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. घबराटीमुळे लोकांना इंधन साठेबाजी करण्यास राऊत भाग पाडत असल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. र
नवनाथ बन


मुंबई, 27 मार्च (हिं.स.)। संजय राऊत हे इंधन, गॅस तुटवड्याबाबत घबराट पसरवत अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. घबराटीमुळे लोकांना इंधन साठेबाजी करण्यास राऊत भाग पाडत असल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. राऊत आणि विरोधक जाणीवपूर्वक जनतेमध्ये चुकीच्या बातम्या पेरत असल्यामुळे लोकं नाहक इंधन आणि गॅस मिळवण्यासाठी लांब रांगा लावत आहेत. खरेतर भारताचा तिरंगा पाहून भारतीय जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन घेऊन जाणा-या जहाजांना जाण्यास परवानगी मिळत आहे. तसेच देशात 2 महिने पुरेल इतका इंधन साठा शिल्लक असून घाबरण्याचे कारण नाही. जनतेने सतर्क राहून राऊत आणि विरोधकांचा डाव उधळून लावावा असेही त्यांनी नमूद केले.

बन म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात इंधन, गॅस पुरवठा विस्कळीत झाला असताना केंद्र सरकार आणि महायुती सरकार युद्धस्तरावर जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहेत. एलपीजी गॅस सिलेंडर धारकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 3 लिटर रॉकेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

राऊतांना लक्ष्य करत बन म्हणाले की, काँग्रेसचे तीर्थ पिऊन पावन झालेल्या संजय राऊतांना हिंदुत्वाची किंमत कळणारच नाही. एनडीए सरकार आणि महायुती सरकारला विरोधाला विरोध करायचा या धोरणानुसार संजय राऊत इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरात इंधन, गॅस पुरवठा विस्कळीत झाला असताना महायुती सरकारतर्फे रेशनकार्ड धारकांना पुरवण्यात येणा-या रॉकेलचा संबंध हिंदुत्वाशी जोडत आहेत. यातून राऊत हे त्यांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध करत आहेत अशी टीकाही श्री. बन यांनी केली. जनतेला दिलासा देण्यासाठी आखलेल्या उपाययोजनांमध्येही संजय राऊत घाणेरडे राजकारण करत आहेत. हिंदुत्वावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका करण्याचा राऊतांना अधिकार नाही असेही त्यांनी खडसावले.

बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे या संकटात भारतीयांना झळ पोहोचत नाही आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा तर डिझेलवर तर शून्य टक्के उत्पादन शुल्क केल्याने जनतेला दिलासा मिळत आहे. श्रीलंका, बांगलादेश, पाकमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती साडे तीनशे रुपये प्रति लिटर झाल्या असून भारतात मात्र या किमती आवाक्यात ठेवण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रालयांना यश आले असल्याचेही ते म्हणाले.

उबाठा गटामध्ये ठाकरे गट विरुद्ध राऊत गट असे द्वंद्व रंगले असून आता आदित्य ठाकरेंबद्दल खोट्या बातम्या पेरण्यापर्यंत राऊतांची मजल गेली असल्याची टीका बन यांनी केली. याआधीही राज्यसभेच्या जागेवरून राऊतांनी ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदींना बाजूला सारून शरद पवारांचे नाव पुढे केले होते, याची आठवण करून देत बन म्हणाले की, आदित्य ठाकरे यांची बदनामी करत राऊत खासदारकी पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande