
रत्नागिरी, 27 मार्च, (हिं. स.) : लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या काका डोर्ले स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जयंत गोपाळ फडके यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
न्यू एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष कै. ता. म. तथा काका डोर्ले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गेले वीस वर्षे सुरू आहे. स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून पंचावन्न स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातील विजेत्यांचा अनुक्रमे तपशील असा - जयंत गोपाळ फडके (जांभूळआड, पो. पूर्णगड, ता. जि. रत्नागिरी) २००० रुपये, कु. प्रतीक्षा राजेंद्र बावळे (शारदाबाई पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शारदानगर, बारामती, जि. पुणे) १५०० रुपये, सौ. अद्विका अवधूत नाईक (वेतोरे, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) १००० रुपये, उत्तेजनार्थ - प्रा. डॉ. निर्मला वसंतराव मोरे (केदार सुनेत्रा कॉलनी, जत, जि. सांगली) ५०० रुपये, दीक्षा भागवतराव वहाणे (वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर) ५०० रुपये. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली.स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या निबंध, वक्तृत्व व वादविवाद विभागाचे प्रमुख डॉ. महेश बावधनकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी