
अकोला, 29 मार्च (हिं.स.)। वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरावर विविध त्रासही वाढताना दिसत आहेत. मात्र या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील म्हैसपूर येथे एक वेगळी आणि प्राचीन पद्धत वापरली जात आहे. आदर्श गौ सेवा केंद्रात दर रविवारी गोमय शाही स्नानाचे आयोजन करण्यात येत आहे.
‘गोमय शाही स्नान’ अकोल्यातील म्हैसपूर येथील आदर्श गौसेवा केंद्रात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक रविवारी गोमय स्नानाचे आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासून येथे शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्वचेच्या संरक्षणासाठी गायीचे शेण आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.अंगाला शेण लावून त्यानंतर त्यात सचैल स्नान केल्याने त्वचेला चमक येते, असा दावा येथे येणारे नागरिक करत आहेत. साबण आणि शॅम्पूपेक्षा गायीचे शेण आणि गोमूत्र अधिक फायदेशीर असल्याचेही यावेळी सांगितले जात आहे.या केंद्रात सुमारे २८०० गायींचे संगोपन केले जाते.
यामधील बहुतांश गायींना कत्तलीसाठी नेले जात असताना गौरक्षक आणि पोलिसांनी त्यांना वाचवले होते. येथे मोठ्या प्रमाणात गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध असल्यामुळे गौभक्त अंगाला शेण-गोमूत्र लावून त्यात सुमारे तासभर खेळतात आणि त्यानंतर साध्या पाण्याने आंघोळ करतात. या स्नानाचे अनेक फायदे असल्याचा दावा केला जात असून दिवसेंदिवस सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.बदलत्या काळात गायीच्या शेण-गोमूत्राचा वापर कमी झाला असला तरी शास्त्रीयदृष्ट्या त्याचे महत्त्व अजूनही कायम असल्याचे येथे सांगितले जात आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा स्नानासाठी मोठे शुल्क आकारले जाते, मात्र या केंद्रात हे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे