
अकोला, 29 मार्च, (हिं.स.)। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशासह राज्यात एलपीजी गॅस चा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक शहरांमध्ये सिलेंडर साठी भर उन्हात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अशातच राज्यात गॅस सिलेंडर टंचाईमुळे पहिला बळी गेला आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या अकोल्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच यांचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे तर याच प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर सडकून टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्धाचा मोठा संघर्ष सुरु आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला करत सुरु केलेले युद्धाने आता घातक वळण घेतले आहे. यामधील एकही देश माघार घ्यायला तयार नसल्यामुळे जगभरात या युद्धाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. या युद्धामुळे एलपीजी, पेट्रोल आणि तेलाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यासह देशात एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. काही ठिकाणी सिलेंडरसाठी लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान राज्यात या गॅस सिलेंडर टंचाईचा पहिला बळी गेल्याचे समोर आले आहे. माजी सरपंचाचा रांगेत उभे असतानाच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे. एक सिलेंडर मिळविण्यासाठी सकाळ पासून रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील व्यक्तीला अचानक चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत व्यक्ती अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच आणि वंचितचे कार्यकर्ते शंकरराव शिरसाट होते...या नंतर त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील ही घटना गांभीर्याने घेत यावर आपला रोष व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता.
राज्यात सिलेंडरच्या टंचाईमुळे गेलेल्या या पहिल्या बळीचा संताप सामान्य नागरीकांडूनही व्यक्त केला जात आहे. एकीकडे गॅस चा मुबलक साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र गॅस एजन्सी समोर लागलेल्या लांब रांगा कशाच्या आहेत असा सवाल ही विचारला जात आहे. यावर आतातरी प्रशासनासह सरकार उत्तर देईल हीच माफक अपेक्षा.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे