
अकोला, 29 मार्च (हिं.स.)। मूर्तिजापूर तालुक्यातील बिडगाव येथे एका शेतकऱ्याच्या गव्हाच्या पेंड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विज वितरण कंपनीच्या कथित दुर्लक्षामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. बिडगाव येथील शेतकरी प्रविण कुऱ्हाडे यांनी आपल्या ४ एकर शेतात साठवून ठेवलेला गहू अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत अंदाजे ५० ते ६० क्विंटल गहू जळाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर प्रशासनाने पंचनामा केला असला तरी केवळ ९० हजार रुपयांचे नुकसान दाखवण्यात आल्याने शेतकरी प्रविण कुऱ्हाडे हतबल झाले आहेत. वास्तविक नुकसान आणि प्रशासनाने दाखवलेले नुकसान यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विदर्भात आधीच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना अशा नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतकरी अधिकच संकटात सापडत आहेत. पिकासाठी घेतलेले कर्ज, आणि आता झालेलं नुकसान यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे