
सोलापूर, 29 मार्च (हिं.स.)।
उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये द्राक्षाच्या खरड छाटणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्याने पुन्हा एकदा नव्या जोमाने आपले शेतातील कामकाज सुरू केले आहे. निसर्गाने चांगली साथ दिली तर चांगले उत्पादन पदरात पडेल, अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी नव्या हंगामाची सुरुवात केली आहे.मागीलवर्षी जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला होता. यापूर्वी झालेले सर्व विक्रम मोडीत काढत पावसाने धुवाँधार बॅटिंग केली होती. त्यामुळे जिल्ह्यात द्राक्षाच्या उत्पादनात जवळपास 35 टक्केहून अधिक प्रमाणात घट झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक खटका शेतकऱ्यांना बसला आहे. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट ओढवले आहे. यंदाचा द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यातच नव्या हंगामाची सुरुवात काही ठिकाणी सुरू झाली आहे. नव्या हंगामाचा पहिला भाग म्हणजे द्राक्षाची खरड छाटणी होय. या छाटणीला उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांमध्ये सुरुवात झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड