
रत्नागिरी, 29 मार्च, (हिं. स.) : जयगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपतीपुळे–चाफे मुख्य मार्गावर अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मधुकर साळवी (वय ५६, मूळ रा. फणसोप, रत्नागिरी, सध्या रा. राम रोड, गणपतीपुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास चाफे ते गणपतीपुळे मार्गावर नेहमीप्रमाणे चालण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्या मार्गावरून वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावरच कोसळले. आसपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड–गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी