
पुणे, 29 मार्च (हिं.स.)। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृह चालकांकडून ग्राहकांकडून ‘गॅस अधिभार’ किंवा या प्रकारच्या कोणत्याही कारणांखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या प्रकारांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) स्पष्टपणे मनाई केली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी देशभरातून प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाने याबाबत कडक भूमिका घेत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही उपाहारगृह चालकांकडून ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी या अतिरिक्त आकारणीचा उल्लेख थेट बिलामध्येही करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची दखल घेत सीसीपीए उपाहारगृह चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे आकारणे ही अनुचित व्यापार पद्धती आहे. गॅस टंचाईचे कारण सांगून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा घेणे हे ग्राहक हिताच्या विरोधी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील उपाहारगृह चालकांना दिलेल्या सूचना, तसेच निर्णय हा स्वागतार्ह आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु