
कळवण, 29 मार्च, (हिं.स.) - महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला रामनवमीपासून मोठ्या उत्सवात सुरू झाली. धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने भाविकांची मोठी रीघ लागली हाती. लाखो भाविक भगवतीच्या चरणी लीन झाले.
सकाळी भगवतीच्या आभूषण अलंकारांची ढोल-ताशांच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या
मिरवणुकीत भाविक सहभागी झाले होते. विश्वस्त संस्थेच्या वतीने देवीला सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आले. सकाळची पंचामृत महापूजा ट्रस्टच्या विश्वस्त मनज्योत पाटील यांनी सहकुटुंब केली. चैत्रोत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्रावर काकडा आरती, पंचामृत महापूजा, रुद्राभिषेक, महानैवेद्य आरती व साज आरती असे विविध धार्मिक विधी भक्तिभावात पार पडले.
सकाळी १० वाजेपर्यंत भाविकांची रांग पहिल्या पायरीपासून चांदणी चौकापर्यंत होती. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असल्यामुळे पोलिस प्रशासन, ट्रस्ट कर्मचारी व सुरक्षा यंत्रणा सतर्क होती. नियंत्रण कक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV