
सोलापूर, 29 मार्च (हिं.स.)।
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी कांदा उत्पादक शिष्टमंडळासह त्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन सादर केले.सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी सध्या तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत असून कांद्याला मिळणारा बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सध्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल केवळ ७०० ते १००० रुपये दर मिळत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे, असे त्यांनी नमूद केले.जागतिक परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या अपुऱ्या निर्यात धोरणांमुळे कांदा निर्यात घटली असून बाजारातील मागणी कमी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून कांद्याची थेट खरेदी करून हमीभाव द्यावा किंवा खरेदी शक्य नसल्यास प्रति क्विंटल किमान १००० रुपये थेट अनुदान (DBI) द्यावे, तसेच कांदा निर्यात तातडीने सुरू करून बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली.केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या वेळी रणजीत पाटील, महेश चव्हाण, शेखर पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड