
सोलापूर, 29 मार्च (हिं.स.)।
महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धामुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे. स्पर्धा सोलापुरात होत असल्याचा मोठा आनंद आहे. पारंपारिक खेळ जोपासण्याबरोबरच आपल्या मातीचा सुद्धा मान वाढवूया. कुस्तीमुळे शिस्त आणि जिद्द वाढते. कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात. कुस्ती आपल्या शरीराला ताकद देते शिवाय ऊर्जाही देते. कुस्तीमुळे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. कुस्तीमुळे आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीने संस्थापिका स्वाती अळ्ळीमोरे - साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापुरात महिला कुस्ती स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच खेळाडूंच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड