हुंडाबळी ही भारतीय समाजाला पोखरणारी ज्वलंत समस्या - जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी, 30 मार्च, (हिं. स.) : हुंडाबळी ही भारतीय समाजाला पोखरणारी ज्वलंत समस्या आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. चिपळूण तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व चिपळूण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडा
हुंडाप्रतिबंधक प्रथेविषयी बोलताना न्या नेवसे


रत्नागिरी, 30 मार्च, (हिं. स.) : हुंडाबळी ही भारतीय समाजाला पोखरणारी ज्वलंत समस्या आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

चिपळूण तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व चिपळूण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडाप्रतिबंधक कायदा व महिलाविषयक इतर कायद्यांची जनजागृती करण्यासाठी महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, हुंडामुक्त समाज हे प्रगत भारताचे लक्षण असून हुंडाबळी रोखण्यासाठी कायद्यासोबत मानवी दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे. हुंड्याची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी कठोर कायदे व सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. तसेच हुंडा प्रथा अजूनही भारतीय समाजात कायम असून तिचे फक्त स्वरूप बदललेले आहे. त्यामुळे हुंडा प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

विविध महिला संरक्षण कायद्याचे महत्त्व समजावून सांगताना त्या पुढे म्हणाल्या की १९६१च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार हुंडा देणे व घेणे गुन्हा असूनदेखील समाजातील लोभी प्रवृत्तीमुळे नववधूंचा बळी जाण्याच्या घटना आजही घडत आहेत. भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते. परंतु या पवित्र बंधनाला पैशाची जोड देऊन हुंडा प्रथा नावाची अनिष्ट परंपरा निर्माण झाली आहे. हुंड्यासाठी महिलांचा छळ करणे किंवा तिची हत्या करणे ही एक अत्यंत दुर्दैवी व अमानवी घटना असून आजच्या आधुनिक समाजाला काळिमा लावत आहे. आज हुंडा प्रथेचे स्वरूप अतिशय भयावह व गुंतागुंतीचे बनले आहे. विवाहात आणि विवाहानंतर अनेक व्यवहार केले जातात की ज्यांना धर्म, संस्कृती, रीतिरिवाज व सामाजिक प्रतिष्ठा यांचा मुलामा दिला जात आहे. आजच्या काळात लोकप्रिय संस्कृतीच्या प्रभावामुळे विवाह हे 'सांस्कृतिक उत्सव' बनले आहेत, की ज्यामध्ये संगीत पार्टी, डिझायनर कपडे, मौल्यवान दागिने आणि छायाचित्रीकरण, डेस्टिनेशन मॅरेज, भव्य लॉन्स इत्यादीचा समावेश विवाहामध्ये असणे तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेचे बनले आहे. या सर्व खर्चाची जबाबदारी नाइलाजास्तव मुलीच्या पित्याला सोसावी लागते. त्यामुळे आधुनिक समाजात हुंड्याची प्रथा संपूर्णपणे बंद करण्यासाठी कायदेविषयक जागरूकता, शिक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक दृष्टिकोनातील बदल ही काळाची गरज आहे, असे डॉ. नेवसे यांनी म्हटले. तसेच त्यांनी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंगनिवड प्रतिबंधक) कायद्याचे महत्त्व उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या वेळी चिपळूण वकील संघाच्या उपाध्यक्ष अॅड. नयना पवार यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या कायद्याच्या तरतुदी उपस्थित महिलांना समजावून सांगितल्या. पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुने यांनी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम २०१२ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पीडितेच्या पालकांनी पुढाकार घेऊन पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच गटविकास अधिकारी श्रीमती. घाटगे यांनी बचत गटाच्या महिलांनी स्वावलंबी व कणखर बनून धाडसी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande